कविता
स्त्री
नेहमीच रंगते मी
तुझ्या रंगात तुझ्या ढंगात
दहा हत्तीचं बळ असतं
आयुष्य सावरायला अंगात
जसा आहे तसा निभावते
मी तुझा संसार
कधीच करत नाही
उगाचच तक्रार
बाहेर लढते घरात ठेवते
जिथल्या तिथे निर्जीव वस्तू
माझ्याच खाणाखुणांनी इथं
जीवंत होते प्रत्येक वास्तू
माहेर सोडून सासरी येते
धागे मनात घट्ट ठेवते
दोन घरं नदीकाठ
मधून जगणं वाहत ठेवते
भावनांच्या ओढ्याला
ओढ आपुलकीची किती
तीच तर मिळत नाही
खूपदा उरात नुसती भीती
अंग अंग भावनांचं
मन माझं प्राजक्त
अलगद सांभाळशील तर
अनुरागानं आरक्त
शक्तीचं काय घेऊन बसलास
शक्तीच मी मूर्तिमंत
जागवत नाही विनाकारण
माया पेरंता नाहीच उसंत
फक्त साथ तुझी सच्ची
आणखी काहीच नको मला
श्वास सुद्धा इतरांसाठी
स्त्री कळेल न कधीतरी तुला?
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.०८/०३/२०२३
सकाळी ०७.५३ वा.
जागतिक महिला दिन