कविता
रंग असे कोणते
सांगू कसे राधे तुझा
रंग गडद किती
मनमोहन असलो जरी
मोहित तुजवरती
रूप तुझे विसरू कसे
रंग रंगलेले
नयन तुझे झुकलेले
भाव दंगलेले
अधोमुखी सुंदरी तू
मोहनाची प्रीत
तुजपुढती फिकी सारी
सारी जग रीत
रंगीत जे माळले तू
कुसुम मन सुमन
बघण्या तुज हरखलो मी
हरवले मज मन
इतकी मोही प्रियतमा तू
कसे सावरू
बिरुद ईश्वरी तरी कसे
मना सावरू
झालो मी राधामय
श्याम न उरलो
तूच सखी अनुपमा मी
तुजसाठी झुरलो
रंगपंचमी मनात
रोज खेळ खेळते
देखण्या प्रियेवरी
रंगश्री मेळते
युग थांबे मीही स्तब्ध
रंग असे कोणते
अनुरागी भिजलेली
प्रीत काही नेणते
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.१३/०३/२०२३
सकाळी ०८.३४ वा.