कविता
एक सुगंधी गुढी मनातून
कुहू कुहू बोले प्रभात झाली
वर्षप्रतिपदा हासत आली
क्षितिजावरती स्वागत करतो
दिनमणी आणिक उषा उगवली
रंग वेगळे त्या तेजाचे
पसरून दशदिशी नवं चैतन्ये
जरी वाटते सकाळ झाली
नवीन संवत्सर ती व्याली
सृष्टी साकारिली ब्रह्म्याने
वसुंधरेवर जीव डोलले
सुरू जाहली गणना काळाची
क्षण क्षण काही कर तू बोलले
नको व्यर्थ मग काळ दवडण्या
करू या काही नवं संकल्पा
गुढी उभारू नवं कार्याची
नवीन रचू या कल्प सुकल्पा
आनंदाची गुढी गगनातून
उंच लहरू दे विजय पताका
श्रीरामाच्या गृह आगमने
रम्य प्रजाजन अभिराम स्वागता
इतिहासाच्या लखळख ज्योती
हृदयामध्ये दरवळ घुमतो
एक सुगंधी गुढी मनातून
उभारून तिज परिमळ रुमतो
शोभन नामक संवत्सर हे
शोभून जावे सारे कणकण
पहा उगवले जणू नव्याने
आज गुढी होऊन हे तनमन
सार्थ होऊ दे नाम शोभनसे
घडू दे सारे शोभन शोभन
पुन्हा नव्याने नित्य चालू दे
आत्मरंगाचे शोधन शोधन
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि २२/०३/२०२३
सकाळी ०६.५१ वा.
वर्षप्रतिपदा,गुढीपाडवा
शुभकामना