कविता
घ्यावी सोनेरी सकाळ
धुक्यातुन गाळलेली
घ्यावी सोनेरी सकाळ
तिची किरणं कांचनी
गळा मोतीयांची माळ
तिच्या ओठावर हसू
दिस झाला कसा सुरू
मंद वाहतो वाराही
तिचे केस भुरुभुरू
जरा वसन मोकळे
आता घट्ट केले तिने
बांध कंबर कसून
काम आरंभीले तिने
गेली चरचरावर
छबी आपुली टाकत
जळी दिसली सुंदर
जरा अवचित वाकत
सांज होईल तोवर
तिला दम नाही बाई
असा उरक कामाचा
तिला तेज देण्या घाई
क्षणी गोड हासली ती
क्षितिजास टेकली ती
पहाटेला रम्य कोणी
अप्सराच वाटली ती
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.१७/०३/२०२३
सकाळी ०८.२८ वा.