कविता
वर आनंदानं द्यावा
ओंबी ओंबीतून गहू
कसा तरारून आला
किती खुशीत डोलला
पहातंच ऱ्हावं त्याला
रंग सोन्याचा लेऊन
घास सोन्याचा देईल
दुःख सारंच इलया
काढणीत त्यो नेईल
घर भरंल धान्यानं
कणगीत त्यो बसंल
आत डोकावून पहा
कसा गालात हसंल
रानामंदी त्याचा तोरा
कसा ताठ कणा झाला
सुगी आणलीया त्यानं
धनी जोमानं नाचला
किरपा देवाजीची झाली
रानी लक्षुमी ही आली
धन सुकाळी गव्हाळी
जगण्याची की नवाळी
काही नगं देवा आम्हा
मुखी घास रोज जावा
नगं उपाशी बा कोणी
वर आनंदानं द्यावा
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.१४/०३/२०२३
सकाळी ०७.३१ वा.