कविता

 

 

प्रीत सरिता किमया करते

मदनदाह वाढतो जाळतो
होईल कमी का कधी
आठवणीने पेटून उठणे
ठिणगी पडण्या अवधी

जाळ भडकतो काळजात या
राहवेना तुजविण
सांग उतारा उपाय कोरा
हृदय चिमणी मिणमिण

आग भडकते तरी ना दिसते
जळते मी अंतरी
वरकरणी हा करून देखावा
शीतलतेचा तरी

डोंब उसळती चाले तळमळ
जीव कासावीशी
कसले औषध कोण जाणता
सापडे न दाही दिशी

भडकून ज्वाळा ताप मनाला
चैन ना थोडीतरी
रती मदनाची वियोगगाथा
ज्वलंत माझ्या उरी

भेट घडविली जर का कोणी
जिवा मिळे शांतता
आत निखारे जे जळणारे
शमवून ही आर्तता

दर्शन नुसते झाले जरीही
मीलन वाटे मला
धग आतली थांबव सखया
तगून राहण्या फुला

पुन्हा ही उमले वेल कोवळी
चैतन्याचा झरा
प्रीत सरिता किमया करते
नियम सदोदित खरा

रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.१३/०३/२०२३
सकाळी ०७.४० वा.