कविता
लक्ष्य लाभे मग मजलाही
निशाणा साधला होता
बघून मी बारकाईने
गुलेर ती ताणली होती
सावजावरती निगुतीने
ओठ मिटलेले आत थोडे
नजर एकाग्र झालेली
कुणी येऊन अवचित मग
दृष्टी लोभस ती टाकलेली
खेचीले छायाचित्र त्याने
हसून गालात थोडेसे
भंगली साधना माझी
चित्त का झाले वेडेसे
पाहिले चोरुनी थोडे
डोळ्याच्या कोपऱ्यातुनी
नजर पडताच का भुलले
मन अलवार आतुनी
निशाणा चुकलेला पुरता
नवे सावज सापडते
कधी घडते अचानकसे
मनाला कोणी आवडते
छबी त्याने मज टिपलेली
मनी माझ्या तो टिपला मी
जीवनाची गुलेर चाले
लक्ष्य लाभे मग मजलाही
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.१३/०३/२०२३
सकाळी ०९.१२ वा.