कविता
पोट नको दे माणसा
भूक पोटाची पापीण
तिला नाही घेणे देणे
घास गिळण्या मिळावा
तिचे एकच म्हणणे
खाती तोंडं कशी बांधू
दाण्याविना कशी रांधू
माया वाढून वाढून
भूक सांगा कशी थांबवू
चूल कशीबशी पेटे
एकदाच दिवसात
भीक मागून मागून
मिळे ना मिळे हातात
पोर भुकेजली माझी
कुणी दिलं हो पाकीट
खाते अधाशी वेडुली
किती द्यावी हो ताकीद
रोज रोज हीच चिंता
आज खायला मिळेल
की उपाशी झोपावे
पाणी कसे हो गिळेल
एक कर देवा आता
पोट नको दे माणसा
नाहीतर गरिबीच्या
पूस पुरत्या कलंका
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.१०/०३/२०२३
सकाळी ०७.४२ वा.