कविता
त्या अंधारातून जागते
गाळून पडते इथे चांदणे
अंधाराची चाळण
काळ्या काळ्या कुट्ट रातीला
आशाफुलांची माळण
ही सरणारी न थांबणारी
कशास चिंता गहिरी
भीती अनामिक नको काळजा
ठरण्या देऊ जिव्हारी
कधी अमावस कधी पौर्णिमा
आत टिपावे धागे
त्याही क्षणांना जगुनी घेता
जीवन नवेच जागे
जरी अंधारली रात्र भयानक
घट्ट मिटावे डोळे
आत सापडे प्रकाश थोडा
स्वप्नंही काही भोळे
मग उघडावे अवचित दोन्ही
नेत्र नव्याने पाही
त्या अंधारातून जागते
वाट नव्याने काही
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.०५/०३/२०२३
सकाळी ०९.१३ वा.