कविता
निज खुशीत रमावे
रानोमाळी उमलती
फुले गुपचूप दूर
त्यांचे कराया कौतुक
यावा काळजास पूर
रंग गुलबक्षी छान
माय राखेरी पान पान
बाप काटेरी जरीही
त्यांचे वारस तुफान
कोणी रसिक न तेथे
तरी उमळण चाले
रोज फुलून हसावे
राती गुमान बसावे
नच कोणीही पाहिले
नाही अजिबात खंत
असे भाळणे स्वतःवर
मग कसली उसंत
असे रुमावे झुमावे
आपल्यातच गमावे
रानफुलासारखेच
निज खुशीत रमावे
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.०९/०३/२०२३
सकाळी ०९.१६ वा.