कविता

 

 

असे असावे घरकुल आपुले

हिरवळ सुखाची दे थंडावा
स्पर्श रेशमी तिचा
घराभोवती कोमल पहारा
हवाहवासा जसा

उन्हे सकाळी होत हळदुली
सोन्याचा शृंगार
ऊब कोवळी बाळ सानुली
चराचरी अभिवार

किंचित पडते धुके पहाटे
दवराणी खुलते
लाजलाजरी उषा त्यावेळी
लावण्या भुलते

झाडे डोलती वाऱ्यासंगे
सळसळ पाने फार
हवा अंगाशी खेळ खेळते
थाट तिचा तो गार

असे असावे घरकुल आपुले
निसर्ग माया अपार
साथ आपुली असो निरंतर
प्रीतही अपरंपार

रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.०९/०३/२०२३
सकाळी ०८.४९ वा.