कविता
चिवचिव गाण प्यारे
कुठे गेली चिऊताई
चिवचिव ग निमाली
तुझी आठवण कुणा
सांग का ग नाही आली
अंगणात तुझं राज्य
पाण्यामध्ये डुबकीत
पंख ओले फडफड
दाणा तुझ्या ग चोचीत
झाड घर तुझे होते
परी घरी तू आमुच्या
काय कथा त्या सांगाव्या
काऊ आणिक चिऊच्या
तुझे घरटे इवले
इवलीच त्यात पिल्ले
घरात तू रहायची
हक्क दाखवीत टिल्ले
तुझा संसार सोन्याचा
तुझ्यामुळे बाल्य खेळे
मान वेळाऊनी तुझे
लाड लाडीकसे चाळे
किती नाजूक कोमल
चिवचिव गुंजायची
लागे मेंदीत टाकाया
विष्ठा आम्ही धुंडायाची
रंग चढत होता ग
जरा हातच्या मेंदीत
जगण्यात चिवचिव
ऊब छताशी थंडीत
नाही आताशी तू येत
का ग रागावली काय
निसर्गाला हानी केली
माणसानं ते अपाय
हाती मोबाईल आता
नाही सजीवांची जाण
किती घातक लहरी
वातावरणही घाण
माझी खिडकी रिकामी
रिकामेच आता छत
अवखळपणा नाही
बालपण यंत्रवत
द्यावे सोडून हे सारे
दोस्त तुम्ही पुन्हा यारे
सवंगडी जीवभाव
चिवचिव गाण प्यारे
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.२०/०३/२०२२
सायं ०६.११ वा.
जागतिक चिमणी दिन