Select Page

कविता

 

 

दान मिळेल नभाचे

ऋतू अंथरला ऋतू मंतरला
रंग कोणते कसे
मनी मदनाचा फुले पिसारा
मधुमास हा वसे

पानोपानी रंग वेगळे
तो सांडून देतो ना
झाडे वेली रम्य सुगंधही
तो मांडून देतो ना

वारे गंधित हलके हलके
उडतील अवकाशी
तशा मीलनाच्या या आशा
फुलती परागाशी

रंग गुलाबी गेले पसरून
गुलाबी तरुतळ सारे
मखमल गेली पसरून पदतळी
पसरले शीतल तारे

इथे घालवला एक जरी क्षण
सार्थक युगायुगाचे
प्रीत पडेल जी पदरी मोहून
दान मिळेल नभाचे

रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.२०/०३/२०२३
सकाळी ०८.५७ वा.