Select Page

कविता

 

 

जाई गंधाळून गेली

जाई उमलून आली
जीव गंधाळून गेली
लाजलाजून वेलीशी
काही गुज ती बोलली

तुझ्यावर बागडून
कळी कळी की खुलली
वारा भेटताच तिला
धुंद होऊन डोलली

अलगद उमलून
गाली हसली पाकळी
तिच्या गालावर खुले
एक चांदणीची खळी

माझा रसिक कोमल
हृदयाचा मक्तेदार
नाही तोडणार मला
वेलीवरी ठेवणार

कधी वाटते मलाही
त्याला गंध कसा देऊ
मग सांडते अंगणी
सेज गवताची मऊ

हळुवार मनाचा तो
अलगद हुंगणार
साऱ्या जन्माचा सुगंध
देत जाई रंगणार

रचना°©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.१९/०३/२०२३
रात्री १०.१७ वा