कविता

 

 

असे मीलन देखणे

अलगद उघडल्या
दल कोवळ्या पाकळ्या
रंग उन्हाचे लेऊन
सोन सोनेरी साखळ्या

आत कुपी अत्तराची
दडविली खोल खोल
कण पराग होऊन
गंध वाऱ्याशी रे डोल

मधूप्राशनास आली
भृंग झुंबड राकट
मधुरव गुंजनात
सारा बहर झाकत

वनातली ही दिवाळी
रोज रोज तेजाळते
दिवे पेटून उठती
वनराई त्या माळते

धुंद रंग पसरती
अंग अंग मधुमय
हृदयात उमलते
प्रिया करे अनुनय

असे मीलन देखणे
रोज कृसुम सुमनी
सुकुमार नि नाजुक
माझी प्रियतम राणी

रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.१७/०३/२०२१
सकाळी ०९.२२ वा.