कविता

 

 

मधुमास फुले वनी

मधुमास मनामध्ये
मदनाचा गंधवारा
तुझ्या आठवांनी येतो
प्रिये तनूला शहारा

सुरभीत मोगरीच्या
माझी सकाळ नाहते
अबोलीची ही दुपार
मूक होऊन राहते

सांज जाईजुईतून
उमलून येत राही
डोळे तुझ्या वाटेकडे
नीज सुखस्वप्न पाही

रती कामदेव खेळे
खेळ वसंतात न्यारे
मनोरथ पुरवावे
तुझ्या समवेत सारे

ये ग ये ना तू कामिनी
माझ्या मनाची मोहिनी
ऋतू घेऊन ओंजळी
छेड तराणे रागिणी

तुजविण नाही काही
बाग ओसाड जीवनी
संगतीस असताना
मधुमास फुले वनी

रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.१७/०३/२०२३
सकाळी ०८.५४ वा.