कविता
रास रंगून हसे श्रीरंग
सुगावा लागला आता
रंग गेले कुठे होते
सकाळी प्राचीवर पसरून
सांजेला रंगले होते
रोजचे रंग निराळे जे
फुला पानात दडलेले
नभी उमटून इंद्रधनुने
रंग सोहळे ते घडलेले
दिशा रंगून जाताना
उषा रंगाळली जाते
निशा रंगात डुंबूनी
अशी गंधाळली जाते
रंग स्वर्गीचे उतरून
उद्यानी काननी खुलती
रंग पंखात मोराच्या
होत लावण्ये हो डुलती
रंग खडकात पाषाणात
रंग रतनांच्या खाणी
कधी हिरवे निळे भुरकट
कधी रंगीतसे पाणी
ही धरा रंगशालू ल्येते
ऋतूंच्या कमानीत न्हाते
रंग मनी होऊनी सरिता
सुखाचे दान देत वहाते
असे हे रंग दिसती बाहेर
अंतरी वेगळाले रंग
आतुनी जोडताच त्याला
रास रंगून हसे श्रीरंग
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.०७/०३/२०२३
सकाळी ०८.२७ वा.
होळी व धुळवडीच्या शुभेच्छा