कविता
चला रंगू या निज रंगातून
रंग ठरलेले आयुष्याचे
कुणी तसे ते ठरवावे
फुलेही जेथे देती सोडून
ठरलेपण का मिरवावे
इथे जुईने रंग पांढरा
सहजीच सोडून हा दिधला
रंग पिवळसर अंगावरती
हळद लावली कुणी तिजला
निश्चित ठरले काही नियम की
संकेतांच्या त्या ओळी
निसर्ग सुद्धा खेळत राहतो
रंगीबेरंगी जणू होळी
सारे सारे रंग शोभती
लेऊन पहावे त्यांस खरे
हा आवडता तो नावडता
कशास नखरे त्यात बरे
चला रंगू या निज रंगातून
श्रीरंगाची उधळण जी
रंग त्याचे ते मोरपिसाचे
रंग साजिरे उसळण की
रंग रंगेरी निळे चंदेरी
सोनेरी लाल पिवळे हे
हिरवे बरवे आणि केशरी
काळे कुठे ते ढवळे जे
रंग ओततो तो रंगारी
आयुष्याच्या वसनावर
घ्यावे जावे रंगून अलगद
क्षणाक्षणांच्या असण्यावर
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.०६/०३/२०२३
सकाळी ०८.३२ वा.